spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुंभारे कॉलोनीत ३ लाख ४७ हजार ६५५ रुपयांची धाडसी घरफोडी

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारे कॉलोनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून, पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

याप्रकरणी आकाश अशोक जगनीत (वय ३४, रा. कुंभारे कॉलोनी, कामठी) यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(३), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी १३ ऑगस्टपासून तिरोडा, जि. गोंदिया येथे गेले होते. दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या मोठ्या बहिणीने फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी तातडीने कामठी येथे परतले. घरी पोहोचल्यावर पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील गोदरेजच्या लोखंडी आलमारीचे लॉकरही फोडण्यात आले होते.

चोरट्यांनी आलमारीतील सोन्याच्या अंगठ्या, नथ, झुमके, कंगन, गोप, लॉकेट, तसेच चांदीचे पैंजण, चैन, कडे, लॉकेट व ब्रेसलेट आदी दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. याशिवाय ३० हजार रुपये रोख आणि पर्समधील ३ हजार रुपये, अशी रोकडही लंपास करण्यात आली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ४७ हजार ६५५ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला वेग दिला आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करण्यासाठी वापरलेला मार्ग, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अन्य तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. अज्ञात चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे करीत आहेत.

Popular Articles