वाहतूक ठप्प, अपघाताचा धोका वाढल्याने नागरिक संतप्त; पर्यायी व्यवस्था न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नागपूर, दि. ७ : कामठी–कळमना ते इतवारी नागपूर रोडवरील जुना कामठी मार्गावर असलेले दोन रेल्वे फाटक (कामठी–कोराडी–खापरखेडा रेल्वे लाईनवरील) दि. १ ऑगस्ट २०२५ पासून कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो स्थानिक नागरिक, विद्यार्थी, कामगार, मजूर आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर आप (आम आदमी पक्ष) नागपूर शहराच्या वतीने संघटनमंत्री प्रदिप पौनिकर यांच्या नेतृत्वात आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांना एक निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर मार्गावर असलेला कावळापेठ ओव्हरब्रिज अत्यंत अरुंद असून, त्यावरून केवळ हलकी वाहनेच जाऊ शकतात. परिणामी, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दररोजच्या ये-जा करताना फार मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
‘आप’ पक्षाने रेल्वे प्रशासनाला मागणी केली की, सदर दोन्ही रेल्वे फाटक त्वरित पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावेत किंवा तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा लवकरच आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी डॉ. अमेय नारनवरे, इकबाल रिझवी (महासचिव), प्रशांत मेश्राम (अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष), शुभम मोरे (युवा आघाडी अध्यक्ष), तेजराम मदन, किसन निमजे, विजय नंदनवार, हेमराज कुंभारे, केतन ठाकूर, मनोज फटींग, संदीप साखरे, राजू दुधेकर, नागसेन सहारे, भीमा बन्सोड, दिपक भाकरे, प्रदिप उराडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








