– १७ रेती तस्करांवर गुन्हे, ७ गुंडांना केले तडीपार; पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांची धडक कारवाई
हंसराज, तुमसर :- तुमसर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुमसर पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. १ जून ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, अनेक सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर तडीपार केले आहे.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रेती तस्करीवर मोठा प्रहार या मोहिमेत सर्वाधिक कारवाई अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर करण्यात आली. रेती चोरीप्रकरणी एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रेतीसह वाहतूक करणारी वाहने असा एकूण १ कोटी ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारूविक्री आणि जुगारावर गदा अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध ३७ गुन्हे दाखल करून ३९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख ५८ हजार ४५० रुपयांचा माल जप्त केला. तसेच जुगाराच्या २० प्रकरणांत २९ आरोपींना पकडून ५४ हजार ३२२ रुपये जप्त केले. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीच्या ३ प्रकरणांत ४ आरोपींकडून १ लाख ३९ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
७ गुन्हेगार तडीपार, एकावर MPDA ची तयारी गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केवळ छापे न टाकता प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये ७ गुन्हेगारांना तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ४ नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यामध्ये एका सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व तुमसर पोलीस पथकाने केली आहे. “अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम भविष्यातही अशीच सुरू राहील. नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध कामांची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





