– एलआयसीच्या विनिवेशामुळे विमाधारकांचे हित धोक्यात – हितेंद्र भट
नागपूर :- देशाच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेचा आधारस्तंभ असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था एलआयसीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने विकायला काढण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे तीस कोटी विमाधारकांचे हित धोक्यात येणार असल्याचे मत ज्येष्ठ विमा कामगार नेते हितेंद्र भट यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून आज येथे व्यक्त केले.
नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी संघटनेचे ६५ वे दोन दिवसीय वार्षिक संमेलन ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ श्रीनिवास खांदेवाले,पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर, विमा पेंशनर्स युनियनचे टि के चक्रवर्ती, धनराज डोंगरे, पी मिलिंदकुमार,हिना जिभकाटे, वाय आर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत तर शिवा निमजे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक सहकार जीवन सभागृहात यशस्वीपणे सुरू झाले.

आपल्या उद्घाटनीय भाषणातून हितेंद्र भट यांनी विनिवेशाच्या माध्यमातून एलआयसीचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. गुंतवणूक नाही, रोजगार नाही, महसूल नाही. म्हणून देशाची तिजोरी भरण्यासाठी सरकार सार्वजनिक क्षेत्र उध्वस्त करीत आहे. एलआयसी ही शेअर बाजाराची कंपनी नसून तीस कोटी विमाधारकांचा विश्वास आहे. एलआयसीला कमजोर करणाऱ्या सरकारच्या या निर्णयाविरोधात विमा कर्मचाऱ्यांनी संघटितपणे आपला आवाज बुलंद करीत सर्वसमावेशक असा व्यापक लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जागतिक साम्राज्यवाद व भारतीय विकासाची दिशा या विषयावर बोलताना मुख्य अतिथी डॉ श्रीनिवास खांदेवाले यांनी अमेरिकेच्या तालावर नाचणारे कटपुतली सरकार विकासाच्या नावावर देशाचा विनाश करीत असल्याची टिका केली.
पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून कृषीप्रधान भारत देशात सरकारच्या कार्पोरेट समर्थक शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे अधोरेखित केले.मंचावर उपस्थित इतर कामगार नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
संमेलनाची सुरुवात संघटनेचे अध्यक्ष शिवा निमजे यांच्या हस्ते संघटनेचा झेंडा फडकाऊन व शहीद स्तंभास पुष्पांजली वाहून करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे सहकोषाध्यक्ष मनोहर पवनीकर व अन्य सेवानिवृत्त सदस्यांचा पाहूण्यांचे हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संमेलनाला विदर्भातील असंख्य विमा कर्मचारी उपस्थित होते.
या भरगच्च संमेलनाचे सूत्र संचालन प्रीती पात्रे यांनी प्रास्ताविक वाय आर राव तर उपस्थितांचे आभार हिना जिभकाटे यांनी मानले.यशस्वीतेकरीता सर्वश्री विवेक जोशी, राजेश विश्वकर्मा, अभय पांडे, राजेश खंडेलवाल, अभय पाटणे, संदिप लातुरकर, लक्ष्मण मौंदेकर, रवि बन्नागरे, नरेंद्र उमाळे,अशोक कालभोरे, सलील मुळे, मुकेश जुमडे, अतुल ठाकरे, देविदास रायपुरकर, जगदीश काळे आदींनी सहकार्य केले.





