किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा २०२६ साठी जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे विषय ऑनलाइन पद्धतीने कळवण्यात आले इयत्ता 1 ली – 2 री साठी विदुषक, घर, माझा आवडता कार्टून तसेच इयत्ता 3 री -4 थी साठी सूर्यास्त, शाळेत जाणारी मुले आणि प्राणी संग्रहालय भेट असे विषय होते. महाराष्ट्रात 8 ऑगस्ट 2026 ला ही स्पर्धा राबविण्यात आली.
मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम अयुबखान यांनी विद्यार्थ्यांंना योग्य ते मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रण करून रंग भरले. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली.
सकाळी 8 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या सुमारे 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापिका पठाण यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “चित्रकला ही केवळ छंद नाही, तर विचार मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळाला असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडक विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार आहे.





