– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडीओ दाखवत केली पोलखोल
मुंबई :- राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या क्लिप आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी तीन ते साडेतीन हजार इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये वाटप करण्यात येत असल्याने हा कार्यक्रम म्हणजे ‘छात्रों की गूंज’ नाही, तर ‘पैसों की गूंज’ असल्याचा घणाघाती आरोप भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. पैशांचे आमिष दाखवणाऱ्या शंतनू या मध्यस्थाचे व्हिडीओ भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दाखवत बन यांनी या प्रकरणाची पोलखोल केली. या गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
हा फक्त आमिष दाखवण्याचा प्रकार नाही तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत आपण पीपीपी मॉडेलमध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप ऐकले होते. पण काँग्रेसचे पीपीपी मॉडेल म्हणजे राहुल गांधी यांचे रीलॉन्चिंग करणारा ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ आहे. या कार्यक्रमासाठी लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये अशा पद्धतीने जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा भांडाफोड बन यांनी केला.
एका कार्यक्रमासाठी दहा-दहा कोटी रुपये खर्च केले जात असतील, तर ‘छात्रों की गूंज’ या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च जवळपास 50 ते 100 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. अशा अनेक कार्यक्रमांद्वारे राहुल गांधींचे रीलाँचिंग करण्यासाठी एकूण किती हजार कोटी रुपयांचे बजेट आहे, याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यावे, असे बन म्हणाले.
या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना फोन करणाऱ्या काँग्रेसशी संबंधित शंतनू नावाच्या मध्यस्थाचे ट्विटर हँडल तपासले असता त्यावर ‘मी नेहरूवादी आहे, गांधीवादी आहे आणि राहुल गांधींचा फॉलोवर आहे’, असे प्रोफाइल आहे. त्यात राहुल गांधी, नेहरू आणि काँग्रेस असा स्पष्ट उल्लेखही असल्याने स्पष्टपणे ते काँग्रेसच्याच व्यक्तीचे आणि तो नंबरही त्याचाच असल्याचे स्पष्ट होते, असे बन यांनी सांगितले.
हा निधी काँग्रेसकडे कशा पद्धतीने आला, हा काळा पैसा आहे का, कंत्राटदारांकडून आलेला आहे का, याची संपूर्ण चौकशी मोदी सरकारने करावी. याचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यासाठी एसआयटी, सीबीआय चौकशी नेमावी. आतापर्यंत राहुल गांधींना 99 वेळा रिलाँच करण्याचा प्रयत्न झाला. मात्र 99 निवडणुकांमध्ये राहुल गांधी अपयशी झाले. पेड पॉलिटिकल प्रोग्राम घेऊन राहुल गांधींना पुन्हा एकदा रिलाँच करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत असेल, तर त्याचे उत्तर काँग्रेस, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले पाहिजे, अशी मागणी बन यांनी केली.
वंदे मातरमला विरोध करत दोनच कडवी गायली गाणार, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींना विरोध करण्यासाठी आज पुणे विद्यापीठात हजारोंच्या संख्येने तरुणाई काँग्रेसच्या कानठळ्या बसतील अशा पद्धतीने सामूहिकरित्या संपूर्ण वंदे मातरम गाणार असल्याने काँग्रेसची पळता भुई थोडी झाली आहे. विजय वडेट्टीवार विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर जाऊन दमदाटी करतात, हे काँग्रेसच्या पळपुटेपणा आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे मंत्री राहिलेल्या विजय वडेट्टीवार विद्यार्थ्यांमध्ये जाऊन गुंडागिरी करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही बन यांनी ठणकावून सांगितले.
जनाब संजय राऊत, काँग्रेस ही ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून सांगितली जात होती. पण हे तर ‘पैशांचे दुकान’ आहे. पुण्यातील सभेला लोक जमणार की नाही या शंकेने काँग्रेसचे नेते आठ दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, सतेज पाटील गेल्या दहा दिवसांपासून सगळे कार्यक्रम सोडून पुण्यात बसले आहेत आणि आज स्वतः संजय राऊत मुंबई सोडून पुण्यात गेलेत. त्यामुळे कोण घाबरले, हे लक्षात येते. मोदी आणि अमित शाह यांना घाबरायची गरज नाही, कारण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, असेबन म्हणाले.
काँग्रेसने या 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत
बन यांनी पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे वाटप करण्यामागे नेमके कोण आहे? कोट्यवधींच्या उधळपट्टीसाठी पैसा नेमका कुठून आला? या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे पैसे कर्नाटक, केरळ अशा काँग्रेसशासित राज्यातील कंत्राटदारांच्या व्यवहारातून आले आहेत का? आणि राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी काँग्रेसचे बजेट किती हजार कोटी रुपयांचे आहे, असे पाच प्रश्न उपस्थित करत याचा हिशेब काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी द्यावा, अशी जोरदार मागणी केली.





