– वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब
नागपूर :- वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी’ किताब लढत २०२६-२७ नागपुरात रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त आयोजनाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा नागपूर येथे रंगणार असून, आज(ता.२२) पिंपरी-चिंचवड (पुनावळे) येथील हॉटेल ब्लू वॉटर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

माजी आमदार तथा नागपूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप जोशी आणि सह संयोजक, मनपा सत्ता पक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मागणीनुसार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांनी ही अधिकृत परवानगी जाहीर केली आहे. नरेंद्र बोरकर यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आले. त्यांच्या सोबत मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर ही उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत वरिष्ठ गट ग्रिको-रोमन महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, तसेच १५, १७ व २० वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांचे नियोजन आणि शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेवरही चर्चा करण्यात आली.





