spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वृक्षांवर अन्याय होताना दिसला, तर ठामपणे विरोध करा’ – ॲड. कृष्णा अग्रवाल

नागपूर :- “वृक्षांवर काही चुकीचे होताना दिसत असेल, तर जागरूक नागरिक म्हणून त्याविरोधात ठामपणे भूमिका घ्या,” असे आवाहन पर्यावरण विषयक कायदेतज्ज्ञ ॲड. कृष्णा अग्रवाल यांनी केले.

वाईल्ड अजाईल फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘निसर्ग बैठक’ या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘वृक्षांनाही हक्क आहेत – वृक्ष कायदा समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. पूर्व विदर्भ महिला परिषद सभागृह, बर्डी येथे शनिवार, २२ ऑगस्ट रोजी झालेल्या या सत्राला नागरिक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी ॲड. अग्रवाल यांनी वृक्ष कायदा म्हणजे काय, वृक्षांना मिळणारे कायदेशीर संरक्षण आणि नागरिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः कलम ८ आणि कलम २१ यातील तरतुदींवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. एखाद्या वृक्षाची तोड करणे आवश्यक असल्यास त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया, आवश्यक परवानगी तसेच नैसर्गिक कारणांमुळे वृक्ष पडल्यास त्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी यांचीही माहिती त्यांनी दिली.

वृक्ष संरक्षणासाठी सामान्य नागरिक कायदेशीर तरतुदींचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो, याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान उपस्थितांनी वृक्षतोड, वृक्ष संरक्षण आणि नागरिकांची भूमिका यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. ॲड. अग्रवाल यांनी प्रश्नांना उत्तरे देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

‘निसर्ग बैठक’ हा वाईल्ड अजाईल फाउंडेशनचा नियमित उपक्रम असून, चर्चासत्रे, चित्रपट, कला आणि संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाशी संबंधित विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत दर दोन महिन्यांनी विविध पर्यावरणीय विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. आगामी सत्रांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी फाउंडेशनच्या संकेतस्थळाला तसेच सोशल मीडिया माध्यमांना भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी पूर्व विदर्भ महिला परिषद, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स, नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन रेझिस्टन्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Popular Articles