प्रतिनिधी हंसराज,गोबरवाही :- जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, गोबरवाही पोलिसांनी सुंदरटोला शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ३ लाख २१ हजार ९७० रुपयांच्या रोख रकमेसह पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा सुंदरटोला येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार राघोर्ते यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून सुंदरटोला येथे छापा टाकला. यावेळी काही आरोपी रंगेहाथ जुगार खेळताना आढळले, तर पोलिसांची चाहूल लागताच दोन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळावरून भाऊराव छोटू मसराम (वय ४५), लोकेश गौरीशंकर चौधरी (वय ३४), राजेश रामा सिंद्राम (वय ३९), पुरुषोत्तम फुलचंद परतेकी (वय ४५, सर्व राहणार सुंदरटोला) आणि शामराव मोतीराम मरकाम (वय ५०, रा. येदरबुची) यांना ताब्यात घेतले आहे. तर संदीप शिवराम नोनारे (वय २८, रा. येदरबुची) आणि विकास शिवचरण कुंभरे (वय २५, रा. सुंदरटोला) हे दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींच्या अंगझडतीतून मिळलेली रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि घटनास्थळावर असलेल्या सहा दुचाकी असा एकूण ३,२१,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा एसपी १२५ (MH 49 BL 3171), हिरो फॅशन प्लस (MH 36 AT 0463), हिरो एचएफ डिलक्स (MH 36 AC 8372), हिरो फॅशन प्लस (MH 36 AT 5875), स्पेंडर प्लस (MH 36 AL 2168) आणि होंडा स्पेंडर (MH 36 A 9558) यांचा समावेश आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४२०/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राघोर्ते, पोलीस हवालदार पेंदाम आणि गोबरवाही पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस अधिकारी करीत आहेत.





