प्रतिनिधी, हंसराज भंडारा :- आगामी सण-उत्सवांचा काळ शांततेत, सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भंडारा पोलिसांनी कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत ठेवण्यासाठी आणि पोलीस दलाची सज्जता दाखवण्यासाठी आज भंडारा शहराच्या मुख्य मार्गांवरून भव्य ‘रूट मार्च’ काढण्यात आला. या उपक्रमाद्वारे पोलिसांनी समाजकंटकांना इशारा देतानाच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे.
या रूट मार्चची सुरुवात पोलीस स्टेशन, भंडारा येथून करण्यात आली. त्यानंतर हा मार्च जलाराम चौक, मेंढा रोड, चांदनी चौक, सामान्य रुग्णालय रोड, पोस्ट ऑफिस चौक, संविधान चौक, तुकडोजी पुतळा आणि गांधी चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येऊन विसर्जित झाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मार्चने शहराचे लक्ष वेधून घेतले.
ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (पवनी, अतिरिक्त चार्ज) तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (भंडारा) ज्योतीका इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ताफ्यात पोलीस निरीक्षक (पो.नि.) भुसारी, पो.नि. गायकवाड, पो.नि. तिवारी, पो.नि.बेलखेडे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) पाटील, स.पो.नि. जगताप, स.पो.नि. बैरागी यांच्यासह आर.सी.पी. (RCP) पथक आणि मोहाडी, वरठी, करडी व कारधा पोलीस स्टेशनमधील अंमलदार सहभागी झाले होते. एकूण १२ पोलीस अधिकारी आणि १४० पोलीस अंमलदारांनी या संचलनात सहभाग नोंदवून पोलीस दलाचे सामर्थ्य दाखवले.
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शहरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, अशी विनंतीही पोलिसांकडून करण्यात आली आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा पोलीस पूर्णपणे सज्ज असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला आहे.





