spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खराब हवामानामुळे मोहगाव शिवारात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; नागरिकांची उडाली धावपळ

हंसराज भंडारा :- आकाशातून येणारा हेलिकॉप्टरचा प्रचंड आवाज आणि त्यानंतर शेतशिवारात झालेले अचानक लँडिंग यामुळे मोहगाव-करडी परिसरातील नागरिकांची काही काळ मोठी धावपळ उडाली. खराब हवामानाचा फटका बसल्याने नागपूरहून रायपूरकडे जाणाऱ्या एका खासगी हेलिकॉप्टरला सुरक्षिततेच्या कारणास्तव मोहगाव येथील शेतात उतरवावे लागले. सुदैवाने, वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

नागपूरहून रायपूरच्या दिशेने त्रिवेणी कंपनीचे ‘४०७जीएक्स’ हे हेलिकॉप्टर सकाळी प्रवास करत होते. मात्र, प्रवासादरम्यान वातावरणात अचानक बदल झाला आणि समोरचा मार्ग धूसर झाला. खराब हवामानामुळे पुढील दिशा शोधण्यात आणि सिग्नल मिळवण्यात अडथळे येत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक यांनी तात्काळ सुरक्षित जागेचा शोध सुरू केला. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास त्यांनी करडी-तुमसर मार्गालगत असलेल्या मोहगाव येथील धनराज बांडेबुचे यांच्या शेताजवळील मोकळ्या जागेत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हे हेलिकॉप्टर करडी आणि परिसरातील गावांच्या अगदी जवळून आणि अत्यंत कमी उंचीवरून उडताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. अचानक शेतात हेलिकॉप्टर उतरलेले पाहून एखादा अपघात झाला असावा, या भीतीने परिसरातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे लँडिंग केवळ खराब हवामानामुळे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि वातावरण निवळल्यानंतर हेलिकॉप्टर पुढील प्रवासासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रसंगावधानामुळे टाळला धोका खराब हवामानामुळे सिग्नल मिळत नसल्याने चालकाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला. लोकवस्ती टाळून मोकळ्या जागेत हेलिकॉप्टर उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी आणि चालक सुरक्षित असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.