spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘वनार्टी’कडून पीएच.डी.च्या १७ अतिरिक्त जागांना मंजुरी

– व्हीजेएनटी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचे आर्थिक बळ

विमुक्त जाती (व्हीजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क आणि ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) या प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)ने १७ अतिरिक्त अधिछात्रवृत्तीच्या जागांना मंजुरी दिली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.

‘महाज्योती’मार्फत शैक्षणिक वर्ष २०२५ करिता पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या एकूण १०० जागांची जाहिरात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी ३५ जागा व्हीजेएनटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ‘वनार्टी’ची नोंदणी २३ जानेवारी २०२६ रोजी झाल्याने आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये संस्थेस उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद मर्यादित असल्याने यापूर्वी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. दरम्यान, व्हीजेएनटी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांकडून अधिछात्रवृत्ती उपलब्ध करून देण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागण्या व निवेदने प्राप्त झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनविषयक हिताचा विचार करून संचालक मंडळाने १७ अतिरिक्त जागांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, या १७ जागांसाठी ‘वनार्टी’कडून स्वतंत्रपणे नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत. महाज्योतीकडे शैक्षणिक वर्ष २०२५ करिता प्राप्त झालेल्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या अर्जांमधील व्हीजेएनटी प्रवर्गातील पात्र अर्जदारांमधूनच निवड केली जाणार आहे. अर्जांची पडताळणी, पात्रता, प्राधान्यक्रम व निवड प्रक्रिया लागू शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना व नियमांनुसार केली जाणार असल्याचेही मा. प्रशांत वावगे यांनी सांगितले. मंजूर करण्यात आलेल्या १७ जागांपैकी विज्ञान व तंत्रज्ञान ९, मानव्यविद्या व सामाजिक विज्ञान ४, आंतरविद्याशाखीय अभ्यास २ आणि वाणिज्य व व्यवस्थापन २ अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अधिछात्रवृत्तीचा कमाल कालावधी पाच वर्षांचा राहणार असून सुरुवातीला दोन वर्षांसाठी कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (जेआरएफ) मंजूर केली जाणार आहे. जेआरएफनंतर त्रिस्तरीय समितीचा अहवाल व उन्नती प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (एसआरएफ) मंजूर केली जाईल. जेआरएफसाठी ३७ हजार रुपये प्रतिमाह, तर एसआरएफसाठी ४२ हजार रुपये प्रतिमाह अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना याशिवाय दोन हजार रुपये अतिरिक्त प्रतिमाह देण्यात येणार आहेत. पीएच.डी. नोंदणीच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा प्रबंध सादर करण्याचा कालावधी यापैकी जो आधी असेल, तो कालावधी अधिछात्रवृत्तीसाठी ग्राह्य राहणार आहे, असल्याचेही प्रशांत वावगे यांनी सांगितले.

संशोधनाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : अतुल सावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीजेएनटी प्रवर्गातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि योग्य मार्गदर्शनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘वनार्टी’च्या माध्यमातून पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळणार असून, या संधीचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.

संशोधन क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण व संशोधन थांबवावे लागू नये, यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. ‘वनार्टी’च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त अधिछात्रवृत्तीच्या जागांमुळे व्हीजेएनटी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा आधार मिळेल, असा विश्वासही अतुल सावे यांनी व्यक्त केला.

Popular Articles