spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाप्यात उत्साहात ईद मिलाद साजरी, जुलूस-ए-मोहम्मदीतून शांतता, बंधुभाव व सामाजिक एकतेचा संदेश; पोलिसांच्या सहकार्याने सोहळा शांततेत संपन्न

खापा, वार्ताहर :- पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा  यांच्या जयंतीनिमित्त खापा शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील मशिदी व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात आला. जुलूसमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

मंगळवारी रात्री ईशाच्या नमाज नंतर नऊ वाजता ईद मिलाद निमित्त मशीन मध्ये मिलाद करण्यात आली.

बुधवारी (२६ ऑगस्ट ) सकाळी ९ वाजता जुलूसची सुरुवात बँक ऑफ बडोदाजवळील मदार शाह बाबांच्या निंबाच्या झाडाखालून करण्यात आली. फुलांनी सजविलेल्या जुलूसने बँक ऑफ बडोदा चौक, भवानी माता मंदिर चौक व किल्लापुरा मार्गे शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण केले. जुलूसच्या मार्गावर नागरिकांनी विविध ठिकाणी चहा, पाणी, नाश्ता, कोल्ड्रिंक्स व गोड पदार्थांचे वितरण करून सहभागींचे स्वागत केले.

जुलूस बाबा लष्कर शाह शहीद दर्गा येथे पोहोचल्यानंतर फातेहा व दुआ करण्यात आली. देशात सुख, शांती, समृद्धी, सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम राहावा, तसेच सर्व नागरिकांचे जीवन सुख-समाधानाचे जावे, यासाठी विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर जुलूस नगर परिषद मार्गे दुपारी एक वाजता खापा मशिदीत पोहोचला.

“नात-ए-पाकने वातावरण झाले भक्तिमय”

खापा मशिदीत नात, सलाम व दुआ पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा  यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या शिकवणीतून मिळणारा शांतता, मानवता, प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला.

मौलाना मकसूद आलम मरकजी यांच्या मार्गदर्शनाखाली जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते. दानिश रजा यांच्यासह अन्य नातख्वानांनी सुरेल आवाजात नात-ए-पाक सादर केली. नात पठणाने उपस्थित वातावरण भक्तिमय झाले.

“पोलिसांच्या सहकार्यामुळे सोहळा शांततेत”

ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जुलूसदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलिसांच्या सहकार्यामुळे संपूर्ण जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह विविध समाजातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत शांतता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

“कमिटी व स्वयंसेवकांचे परिश्रम”

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मशिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख, उपाध्यक्ष सईद कुरेशी, सचिव मकसूद शेख, सहसचिव आशिक पठाण, सदस्य फिरोज (गुड्डू) पठाण, इस्राईल (भूरु) शेख, रफिक शेख, सलमान कुरेशी यांच्यासह मशिद कमिटीचे पदाधिकारी, युवक, स्वयंसेवक आणि शहरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles