– ऑल इंडिया आंबेडकर महासभा (पंजी) तर्फे कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी
नागपूर :-ऑल इंडिया आंबेडकर महासभा (पंजी) तर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंदोलन व आजची परिस्थिती’ या विषयावर विशेष चर्चा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी, सकाळी ११ वाजता तथागत बुद्ध विहार, हिवरी नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या विचारांचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी संबंध जोडून या कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात येईल. आंबेडकरी चळवळी समोरील सद्या आव्हाने, चळवळीची सद्यस्थिती तसेच भविष्यातील दिशा यावर मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत धम्म प्रचार संघाचे अध्यक्ष दिलीप रामटेके राहतील. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऑल इंडिया आंबेडकर महासभेचे अध्यक्ष राकेश बहादूर, महासचिव सरदार अमरिक सिंह बांगर, कोषाध्यक्ष सौ. रीना गावस्कर वाल्मिकी तसेच पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती कलाम शेख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रीवा, मध्य प्रदेशचे आदिवासी नेते छोटू कौल, हैदराबाद, तेलंगणाचे ॲडव्होकेट नानूर गोपाल तसेच ऑल इंडिया आंबेडकर महासभा, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष निर्मलजीत यांची उपस्थिती राहतील. आंबेडकरी विचारसरणीचा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेवर झालेला प्रभाव, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि वर्तमान सामाजिक परिस्थितीत आंबेडकरी चळवळीची भूमिका या विविध विषयांवर कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे. त्यामुळे आंबेडकरी विचार आणि चळवळीची दिशा समजून घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन असलम खातमी व राहुल मोरे यांनी आहे.








