– ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमातून देशप्रेमाचा अनोखा संदेश; विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगाव बांध : रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा संदेश देतानाच देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, परसोडी (रयत) येथे राबविण्यात आला. ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत वर्ग पहिली ते आठवीतील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार करून त्या भारतीय जवानांना पोस्टाद्वारे पाठविल्या.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. शारदा कापगते यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी विविध रंग, सजावटीचे साहित्य आणि उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने राखी तयार करण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. त्याचबरोबर या उपक्रमातून सर्जनशीलता, स्वावलंबन, बंधुभाव आणि देशप्रेम यांसारख्या मूल्यांची रुजवण करण्यात आली.
विशेष म्हणजे, विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या केवळ शाळेतील भाऊ किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी न ठेवता, देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस भारतमातेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या. जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व कृतीशील उपक्रम राबविले जातात. पुस्तकातील ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या उपक्रमासाठी पदवीधर शिक्षिका सपना शामकुवर, गोविंदा चचाने, मुख्याध्यापक वीरेंद्र भिवगडे, तालेश्वर नेवारे, टेंभुर्णी, सूरज वाढई आणि गायत्री यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विद्यार्थिनींच्या हातून तयार झालेली राखी सीमारेषेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या हातावर पोहोचणार असल्याने या उपक्रमाला विशेष भावनिक व राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘राखीच्या धाग्यातून जवानांप्रती कृतज्ञता’ व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे परसोडी परिसरासह गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.








