spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या स्वच्छता दूतांना राखी बांधत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी दिल्या शुभेच्छा

– ‘आरोग्यरक्षक भाऊ यांना लिहिले पत्र

नागपूर :- नागपूर शहराची स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी यावर्षीचा रक्षाबंधन अतिशय आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील पद्धतीने साजरा केला.त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून आणि शुभेच्छापत्र देऊन त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी-वखरे यांच्या विशेष पुढाकाराने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा दिवस अत्यंत भावनिक ठरला.

कर्तव्याशी तडजोड न करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

नागपूरची ‘रोगराई’पासून रक्षा करणारे हे स्वच्छता कर्मचारी शहराच्या आरोग्यव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा कणा आहेत. उन्हाळा असो, मुसळधार पाऊस असो किंवा कोणताही मोठा सण-उत्सव असो, नागरिकांच्या सुविधांसाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हे कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या याच अतुलनीय योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक अत्यंत अर्थपूर्ण प्रयत्न असल्याचे स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी यावेळी सांगितले. “सुरक्षेची आणि संरक्षणाची भावना जपणारा सण”

या उपक्रमाबाबत बोलताना शिवानी दाणी-वखरे म्हणाल्या, “आपल्या शहराची रक्षा करणाऱ्या प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हाताला सन्मान मिळणे ही आपली जबाबदारी आहे. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून, एकमेकांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची भावना जपणारा दिवस आहे. नागपूरला स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज त्यांना राखी बांधून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.”

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला यावेळी उपस्थितांतर्फे ‘मानाचा मुजरा’ करण्यात आला.

प्रिया भाऊ आशयाचे पत्र

शिवानी दाणी वखरे यांनी आपल्या पत्रात, “भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आणि संरक्षणाचा सण म्हणजे रक्षाबंधन. ज्याप्रमाणे एक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे तुम्ही रात्रंदिवस ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता संपूर्ण नागपूरकरांच्या स्वच्छतेची काळजी घेत त्यांच्या आरोग्याचे रक्षण करत आहात.” असा उल्लेख केला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे व वंदनीय असल्याचे नमूद करत त्या पुढे म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पण भावनेमुळेच आपले शहर रोज मोकळा श्वास घेते आणि एक नवी चैतन्यपूर्ण पहाट अनुभवते. रक्षाबंधनाच्या या शुभप्रसंगी सफाई कर्मचाऱ्यांच्या अविरत आणि अथक मेहनतीबद्दल स्थायी समिती तसेच संपूर्ण नागपूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ईश्वर सर्व सफाई कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी प्रदान करो, अशी प्रार्थनाही शिवानी दाणी वखरे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत एका लोकप्रतिनिधीने बहिणीच्या नात्याने व्यक्त केलेल्या या कृतज्ञतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Popular Articles