नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकल्पनेतून नागपूरातील नागरिकांचे कॅन्सर सारख्या गंभीर आजारपूर्वी प्राथमिक निदान व्हावे व महिलांच्या निरामय आरोग्यासाठी कॅन्सर तपासणी रुग्णवाहिकेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आले.
रविवारी श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिर महाल येथे स्व भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे नागपुरकरांच्या निरामय आरोग्यासाठी कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संग्रामसिंग भोसले महाराज, नगरसेवक श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, बंडू राऊत, कल्याणेश्वर मंदिराचे गुणवंतराव पाटील, अशोक गुप्ता, भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर चे अतुल मंडलेकर, शिबिर संयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे, स्वामी विवेकानंद संस्थेचे जयपाल टाकोटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात २०० हून अधिक महिलांनी तपासणी केली असून या शिबिरात महिलांसाठी गर्भाशय मुख कर्करोग, स्तन कर्करोग, मुख कर्करोग , ट्युमर, आदी कॅन्सरची निःशुल्क प्राथमिक तपासणी करण्यात आली असून विशेष रुपात गरजूसाठी प्राथमिक निदानासहित मेमोग्राफी तपासणी निःशुल्क करण्यात येईल. शिबिरातील निदान झालेल्या व्याधीग्रस्त रुग्णांसाठी स्व भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर द्वारे अत्यल्प दरात एमआरआय, सीटी, आणि रक्त तपासणी करण्यात येईल.या उपक्रमासाठी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवा संस्थेचे जयपाल टाकोटे, डॉ भारती शरदचंद्र, मंजुश्री चन्न्ये, अमिषा टाकोटे, राम लाभे, तेजस पाटील आदींचे सहकार्य लाभले. स्व भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे ५ वर्षापासून सुरू असलेल्या मोतियाबिंदू मुक्त नागपूर अभियान अंतर्गत १६७८ आरोग्य शिबिरामध्ये ९ लाख रुग्णांची नेत्र तपासणी, ९८३४५ रुग्णांना चष्मा आणि ५००० हून अधिकचे कॅट्रॅक्ट ऑपरेशन करण्यात आले. तसेच ८०० हून अधिक ज्येष्ठांना कर्णयंत्र वाटप करण्यात आले.
नागरिकांनी या कॅन्सर मुक्त अभियान शिबिराद्वारे आपली तपासणी करून निरामय व स्वस्थ जीवनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.





