हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण? सुकळी नकुल येथील ग्रामस्थ महेंद्र जयपाल रहांगडाले आणि इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गावात मातोश्री पांदण रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अस्तित्वात असलेल्या रोडवर पुन्हा खर्च: तक्रारीत नमूद केल्यानुसार, ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषद निधीतून सिमेंट कॉक्रीटचा पक्का रस्ता बांधण्यात आला होता, त्याच रस्त्यावर पुन्हा ‘मातोश्री पांदण रस्ता’ मंजूर करून सुमारे २१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ही कामे जेसीबी मशीनद्वारे करण्यात आली. मात्र, कागदोपत्री स्थानिक मजुरांच्या नावे हजेरी लावून (मस्टर भरून) मजुरांच्या हक्काचे पैसे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अन्य काही पांदण रस्त्यांच्या कामात अंदाजपत्रकाप्रमाणे (Estimate) काम न करता निकृष्ट दर्जाचे मुरूम आणि गिट्टी वापरण्यात आली आहे. रस्त्याची उंची आणि रुंदी नियमानुसार नसल्याने तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोऱ्या न बांधल्याने पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या कामांबाबत ग्रामसभेत विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच, माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती मागितली असता, ग्रामपंचायत कार्यालयात या कामाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर देण्यात आले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या संपूर्ण गैरप्रकाराची वरिष्ठ स्तरावरून ‘मोका चौकशी’ करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुकळी नकुल येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या गंभीर तक्रारीवर जिल्हा प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





