हंसराज भंडारा :- जिल्ह्यातील भंडारा शहर आणि पवनी येथे वृद्धांना लक्ष करून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा आणि पवनी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. जनरलसिंग ऊर्फ मन्नूसिंग रामसिंग टाक (वय ४० वर्षे, रा. समता नगर, नेरी दुर्गापूर, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पत्ता विचारण्याच्या आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्धांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र हिसकावून नेले होते. पोलिसांनी या आरोपीकडून एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
यातील पहिली घटना १२ मार्च २०२६ रोजी भंडारा शहरातील यशोदा नगर परिसरात घडली.फिर्यादी राजेंद्र भीमराव चव्हाण (वय ६८) यांना ‘नमो शेंडे कुठे राहतात?’ असे विचारून आरोपीने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची साखळी हिसकावून नेली होती. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरी घटना २२ जून २०२६ रोजी पवनी शहरात घडली. फिर्यादी मीरा रामकृष्ण टिपले (वय ६५) यांच्या घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने शिरून आरोपीने त्यांचे १७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात कलम ३०४ (२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंद आहे.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले होते. तपासादरम्यान वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पीएसआय प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीकडून जिल्ह्यातील इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





