संदीप कांबळे,कामठी :- बिबट्याच्या वाढत्या वावराने कामठी तालुक्यातील बिनासंगम परिसर अक्षरशः हादरला आहे. गेल्या दोन दिवसांत बिबट्याने दोन वासरांची शिकार केल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मानवी वस्तीजवळच बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाने आता केवळ पाहणी न करता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी होत आहे.
बिनासंगम येथील विजय भडंग यांच्या गावालगतच्या शेतात गोठा असून, तेथे गायींसह दोन वासरे बांधण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दबकत आलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून वासरावर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या वासरावरही झडप घेतल्याचे समोर आले.
रविवारी सकाळी शेतात गेल्यानंतर मृत वासराचे अवशेष आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी बिबट्याच्या पाऊलखुणाही आढळून आल्या. त्यामुळे वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली.
खापा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल आशिष खोब्रागडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे
बिबट्या शेतातील जनावरांवर हल्ले करीत थेट मानवी वस्तीजवळ पोहोचल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणेही शेतकऱ्यांना धोकादायक वाटू लागले आहे. विशेषतः लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
बिबट्याच्या वावराची माहिती वन विभागाला देऊनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवावी, कॅमेरे लावावेत आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दोन दिवसांत दोन वासरे गमावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून, पुढील शिकार जनावरांची नव्हे तर माणसांची होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.





