– रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांची कटींग करण्याची गरज; अपघाताचा धोका वाढला
पांढरकवडा :- शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध भागांतील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यातच रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे सुरू असलेल्या पथदिव्यांचा प्रकाशही रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नगरपरिषद प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरातील काही रस्त्यांवर पथदिवे असूनही त्यांच्या प्रकाशात अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी फांद्या पथदिव्यांभोवती पसरल्याने प्रकाश झाकोळला जात आहे. परिणामी रात्रीच्या वेळी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत आहे.
विशेषतः रहदारीच्या रस्त्यांवर अंधारामुळे किरकोळ अपघातांची शक्यता वाढली आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना अंधाऱ्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना असुरक्षित वाटत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
पथदिव्यांची दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी या दोन्ही बाबी एकाच वेळी हाती घेण्याची गरज आहे. केवळ पथदिवे सुरू करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यांच्या प्रकाशात अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणेही आवश्यक आहे. यासाठी नगरपरिषद आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेला हा प्रश्न वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यास प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या अधिक वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बंद पथदिव्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी तसेच पथदिव्यांचा प्रकाश अडविणाऱ्या झाडांच्या फांद्यांची आवश्यक ती कटींग करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





