कामठी :- महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्ष, संत गाडगेबाबा यांचे १५० वी जयंती वर्ष व महाड चवदार तळे शताब्दी वर्ष या तिन्ही ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजकार्य महाविद्यालय, कामठी येथे भव्य प्रबोधन सोहळा संपन्न झाला. हा प्रबोधन सोहळा समाजकार्य महाविद्यालय, कामठी व जनहित युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या, उद्घाटक म्हणून अमोल मैत्री संघाच्या संस्थापिका रंजना सुरजुसे, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व ॲड. सचिन मेकाले यांची उपस्थिती लागली होती. विशेष अतिथी म्हणून कोरो इंडिया संस्थेचे दीपक मरघडे व जनहित युवा फाउंडेशनचे शिवशंकर ताकतोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून प्रबोधन सोहळ्याला सुरुवात झाली. दीपक मरगडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी रंजना सुरजुसे आणि शिवशंकर ताकतोडे यांनी समायोचित भाषणे केली. या प्रसंगी ॲड. सचिन मेकाले यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वावर आपल्या काव्यात्मक शैलीतून सखोल प्रकाश टाकला व सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनीही आपल्या उत्स्फूर्त भाषणातून महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला. अध्यक्षीय भाषणातून डॉ. रुबीना अन्सारी यांनी सर्व वक्त्यांच्या भाषणांचा परामर्श घेऊन महात्मा फुले संत गाडगेबाबा व डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यावर मौलिक व मूलभूत मार्गदर्शन केले. संचालन डॉ. सविता चिवंडे यांनी केले तर आभार डॉ. मनीष मुडे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





