– शिक्षण संचालकांकडून प्रस्ताव; मंजुरी मिळाल्यास उन्हाळी सुट्टीतील कामाची सेवा पुस्तिकेत नोंद
नागपूर :- जनगणना आणि बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कामासाठी मे महिन्यात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामाच्या बदल्यात अर्जित रजेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शिक्षकांनी केलेल्या कामाची नोंद सेवा पुस्तिकेत करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास संबंधित शिक्षकांना त्यांनी केलेल्या कामाच्या कालावधीच्या प्रमाणात अर्जित रजा मिळू शकणार आहे.
मे महिन्यात शिक्षकांना नियोजित उन्हाळी सुट्टी असते. मात्र, या कालावधीत जनगणना आणि बीएलओची जबाबदारी पार पाडल्याने अनेक शिक्षकांना सुट्टीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी होती. सुट्टीच्या कालावधीत शासकीय काम करणाऱ्या शिक्षकांना त्या बदल्यात अर्जित रजा देण्याची तरतूद महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये असल्याचे सांगण्यात येते.
सुट्टीच्या काळात शिक्षकाने जितके दिवस काम केले असेल, त्यानुसार अर्जित रजेची नोंद त्यांच्या रजा खात्यात करता येते. तसेच संबंधित नोंद सेवा पुस्तिकेत करण्याची तरतूद आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये अशा प्रकारच्या नोंदी केल्या जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत.
यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शिक्षण संचालकांनी सुट्टीच्या कालावधीत बीएलओ व जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना अर्जित रजा देण्यास तसेच त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करण्यास मंजुरी मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. आता या प्रस्तावावर शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.





