spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडा डीजेमुक्त करण्याचा संकल्प; उत्सवात पारंपरिक ढोल-ताशांचा गजर अन् शिस्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन

पांढरकवडा :- लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान, परंपरा आणि शिस्तीच्या चौकटीत साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समिती आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पांढरकवडा शहर यंदा पूर्णपणे ‘डीजेमुक्त’ करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त करण्यात आला.

उत्सवाच्या काळात स्थापना ते विसर्जन या दरम्यान विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांची दखल घेतली जाणार आहे. तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर उत्कृष्ट मंडळांना पारितोषिके देऊन गौरवले जाईल. राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांकांसाठी तब्बल १५ लाखांपर्यंतच्या बक्षिसांची तरतूद शासन निर्णयानुसार (जीआर) करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष पारितोषिके दिली जाणार असल्याचे ठाणेदार एल.डी तावरे यांनी सांगितले.

डीजेच्या घातक परिणामांवर चिंता

बैठकीत डीजे आणि उच्च आवाजाच्या भितीमुळे होणाऱ्या घातक परिणामांवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन आणि डीजेच्या तीव्र लहरींमुळे हृदयविकाराचा झटका येऊन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या वैद्यकीय निष्कर्षांचा दाखला यावेळी देण्यात आला. डीजेमुळे होणारे ध्वनी व पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे पालन करावे किंवा डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यप्रकारांचा स्वीकार करावा, असे स्पष्ट करण्यात आले.

ढोल-ताशा पथके आणि सांस्कृतिक जपवणूक*

डीजेवर लाखो रुपयांचा खर्च करण्याऐवजी अवघ्या काही हजार रुपयांत ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्ये खरेदी करून मंडळांना ती दीर्घकाळ वापरता येतील. या माध्यमातून तरुण पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना सरावाच्या निमित्ताने शारीरिक व्यायाम व शिस्त शिकवता येईल. तसेच, महिला व मुलींचा सहभाग वाढवून पारंपरिक पोशाखात संस्कृतीचे दर्शन घडवता येईल, असा सूर बैठकीत उमटला.

पांढरकवडा शहरात यापूर्वी ‘युवा टायगर फोर्स ‘च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. त्याच धर्तीवर यंदा सर्व गणेश मंडळे, शांतता समिती सदस्य, माजी पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव आणि राजकीय प्रतिनिधींच्या सहकार्याने शहर डीजेमुक्त करून एक आदर्श पायंडा पाडला जाईल, असा विश्वास पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल.डी तावरे यांनी व्यक्त केला.

उत्सवासाठी प्रशासकीय नियमावली व सूचना:

१) ऑनलाइन परवानगी: सर्व गणेश मंडळांना उत्सवासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक राहील.

२) रस्त्यावरील जागा: मंडप उभारताना मुख्य रस्त्याचा ७५ टक्के भाग वाहतूक व नागरिकांसाठी मोकळा ठेवावा; केवळ २५ टक्के जागेचा वापर मंडपासाठी करावा.

३) दारू पिऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागास बंदी: देवतुल्य श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत काही कार्यकर्ते दारू पिऊन सहभागी होत असल्याचे चित्र अत्यंत खेदजनक आहे. अशा प्रकारांवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कडक अंकुश ठेवावा.

४) सुरक्षा व उपाययोजना: विसर्जन मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रात्रीच्या वेळी पुरेशा दिव्यांची सोय करणे यासाठी नगरपरिषद व संबंधित विभागांशी संवाद साधला जाईल.

५) मिरवणुकीतील सुरक्षितता: वाहनांवर चढून आक्षेपार्ह हावभाव करणे, ध्वजाचे पाईप निष्काळजीपणे फिरवणे यावर बंदी राहील.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.