spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘पेसा’ क्षेत्रातील ग्रामसभा सक्षमीकरणासाठी ३ सप्टेंबरला ‘पंच-संमेलन’

– ग्रामसभा, ग्रामपंचायतींचे अधिकार, रोजगार व आजीविकेसह ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर होणार मार्गदर्शन

गडचिरोली :- अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायती अधिक सक्षम करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील रोजगार व आजीविकेच्या संधी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, गडचिरोलीतर्फे ‘जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा व पंच-संमेलन कार्यक्रम २०२६-२७’ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

पेसा कायदा व ग्रामीण विकासावर मंथन

पंचायत क्षेत्रासंबंधी उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ (पेसा कायदा) आणि विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा २०२५ यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या पंच-संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभा, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, रोजगार, आजीविका तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर लोकप्रतिनिधी, पंच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्रामस्तरावरील संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभागातून ग्रामीण विकासाला चालना आणि ग्रामीण भागातील रोजगार व आजीविकेच्या संधी अधिक सक्षम करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रामसभेचे अधिकार, थेट निधीसह विविध विषयांवर मार्गदर्शन

कार्यशाळेत ‘पेसा कायदा : संकल्पना, उद्दिष्टे व प्रमुख तरतुदी’ या विषयावर राज्य पेसा कक्षाचे संचालक शेखर सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ‘ग्रामसभा अधिकार व ग्रामपंचायत भूमिका (पेसा अंतर्गत)’ या विषयावर प्रशिक्षण व क्षमता बांधणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५ टक्के थेट निधी योजना या विषयावरही स्वतंत्र सत्र होणार आहे.

दुपारच्या सत्रात विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा २०२५ याची पार्श्वभूमी व उद्दिष्टांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच पेसा कायद्याच्या निर्देशानुसार मजुरीची घनता व व्यवस्थापन नियम २०२६, मुख्यमंत्री ग्रामीण पथधरण व पशु विकास जोडरस्ता योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची सद्यस्थिती व प्रगती या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रश्नोत्तर, अनुभव संवाद, पुढील कार्यवाही आणि समारोपाचे सत्र होईल.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सदस्य डॉ. नामदेव किरसान, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले व अरुण लखाणी, विधानसभा सदस्य डॉ. धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे व रामदास मसराम उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. गजेंद्र नरवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि राज्य पेसा कक्षाचे संचालक शेखर सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पंच-संमेलनाच्या माध्यमातून पेसा कायद्याच्या तरतुदी आणि ग्रामसभांच्या अधिकारांबाबत ग्रामस्तरावरील यंत्रणांची समज अधिक व्यापक करण्यासह ग्रामपंचायतींची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.

संबंधित लोकप्रतिनिधी, पंच, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या जिल्हास्तरीय कार्यशाळा व पंच-संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर, विकसित भारत जी राम जी (ग्रामीण) चे अतिरिक्त कार्यक्रम समन्वयक चेतन हिवंज आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पंकज भोयर यांनी जिल्हा परिषदेतर्फे केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.