– नवेगावबांध येथे ब्रह्माकुमारीज्तर्फे ‘नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पंकज परशुरामकर,नवेगावबांध :- रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शाखा नवेगावबांध यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘मिशन स्पंदन’ अंतर्गत ‘नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात पार पडले. दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतीनिमित्त आयोजित या अभियानातून व्यसनमुक्ती, पवित्रता, आरोग्य आणि संस्कारमय जीवनाचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे बंधन नसून समाजातील वाईट प्रवृत्तींपासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि इतर व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवून कुटुंब आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी ‘मी स्वतः व्यसन करणार नाही आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेन’, असा निर्धार करत नशामुक्त जीवनाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. व्यसनामुळे कुटुंबाचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या अभियानाला बी. के. उषा दीदी (सेवाकेंद्र संचालिका, वरठी), बी. के. चंद्रकला दीदी (संचालिका, नवेगावबांध), बी. के. टीना (नवेगावबांध) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अभिमन्यू कापगते, अण्णाजी पा. डोंगरवार, काशिवार, पंढरी काशिवार, रामदास बोरकर, एकनाथ बोरकर, महादेव बोरकर, विजया कापगते, वैशाली बोरकर, बळीराम कापगते, दिलीप पोवळे यांच्यासह बहुसंख्य महिला-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाने ‘स्वतः व्यसनमुक्त व्हा आणि समाजालाही व्यसनमुक्त करा’ असा सकारात्मक संदेश दिला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नवेगावबांधमध्ये नशामुक्त समाजनिर्मितीच्या अभियानाला नवी ऊर्जा मिळाली.





