नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलै २०२६ अशी मुदत संपलेले सलाईन चढविण्यात आलेल्या ५० वर्षीय गोपीराम खडसे या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. या घटनेमुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मृताच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
गोपीराम खडसे यांच्यावर वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना जुलै २०२६ ची मुदत संपलेले सलाईन चढवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. सलाईन चढवल्यानंतर खडसे यांची प्रकृती अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तत्काळ शेजारील फोर्टीज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.
गेले दोन दिवस गोपीराम खडसे यांची फोर्टीज रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, मध्यरात्री सुमारे १:२० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच खडसे यांचा जीव गेल्याचा थेट आरोप त्यांच्या कुटुंबाने केला आहे.
या घटनेची माहिती पसरताच संतप्त नातेवाईकांनी आणि नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचाच हा आणखी एक बळी ठरल्याने, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.





