spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका! 

– ५ ब्रास वाळूसह टिप्पर व तीन ट्रॅक्टर जप्त; ३० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत एक टिप्पर, तीन ट्रॅक्टर व ५ ब्रास वाळू असा एकूण ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १ सप्टेंबर रोजी दावनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालगाव ते धापेवाडा मार्गावर करण्यात आली.

पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिसांना महालगाव घाट येथील वैनगंगा नदीपात्रातून वाळू काढून टिप्पर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैधरित्या वाहतूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी महालगाव ते धापेवाडा मार्गावर नाकाबंदी केली. काही वेळात महालगावच्या दिशेने एक टिप्पर व तीन ट्रॅक्टर एकापाठोपाठ येताना दिसून आले. पोलिसांनी सर्व वाहने थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. संबंधितांनी सदर वाळू महालगाव घाट येथील वैनगंगा नदीपात्रातून काढून विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर व दोन ब्रास वाळू, तसेच तीन स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर-ट्रॉली व तीन ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त वाहनांसह वाळूची एकूण किंमत ३० लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सागर कन्हैय्यालाल नेवारे (वय २८, रा. कुंभारटोली, आमगाव), टिप्पर मालक प्रकाश राऊत (रा. आमगाव), ट्रॅक्टर चालक अंकित कामठे (रा. खुर्शीपार, ता. खैरलांजी, जि. बालाघाट), ट्रॅक्टर मालक राजू अनंतराम बंबारे (वय ३६, रा. महालगाव), चैनलाल मदारीलाल बंबारे (वय ५१, रा. महालगाव) आणि चरण भाऊलाल मंदरेले (वय ३५, रा. महालगाव) या सहा जणांविरुद्ध दावनीवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा संजय चव्हाण, पोहवा सोमेन्द्रसिंग तूरकर, पोहवा रियाज शेख, पोहवा दीक्षितकुमार दमाहे, पोहवा सुबोध बिसेन व पोशि छगन विठ्ठले यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.