– बोरी-सिंगोरी व बोरी-राणी येथील शेतकऱ्यांचे आंदोलन; नुकसान भरपाई व प्रकल्पाची माहिती देण्याची मागणी
कन्हान :- प्रस्तावित तिसऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी बोरी (सिंगोरी) आणि बोरी (राणी) गावातील शेत जमिनींची मोजणी करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, बाधित शेतक ऱ्यांनी तीव्र विरोध करत आंदोलन केल्याने प्रशासनाला भूमापनाची प्रक्रिया सुरू न करताच परतावे लागले.
प्रस्तावित तिसरा बाह्यवळण रस्ता बुधवार (दि.२) सप्टेंबर ला बोरी (सिंगोरी) येथे काही अधिकारी मार्कींग करण्यास आले असता तेथील बाधित शेत क-यांनी आम्हाच्या जमिनी विषयी जो पर्यंत अधिकारी चर्चा करित नाही तोपर्यंत आम्हच्या शेतात पाय ठेवायचा नाही म्हणुन आलेल्या मार्कींग अधिकारी व कर्मचा-यांना परतुन लावले. आज गुरुवार (दि. ३) सप्टेंबर रोजी पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगोरी) आणि बोरी (राणी) गावांमध्ये प्रकल्पासाठी भूमापना ची प्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरू करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएमआरडीए अधिकारी, स्थानिक पोलीस तसेच एमएसएफ पथकाचे जवान च्या दोन मोठया गाडया यांचा मोठा बंदोबस्त उपस्थित होता. मात्र गावकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला भूमापन न करताच माघारी फिरावे लागले. प्रकल्पा मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी या भूमापनाच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन केले. शेतकरी संघर्ष समिती पारशिवनी तालुक्याच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपला विरोध नोंदविला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, योग्य नुकसान भरपाई निश्चित न करता आणि प्रकल्पासंबंधित आवश्यक माहिती न देता जबरदस्तीने जमिनीची मोजणी सुरू केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी ओमप्रकाश काकडे, राहुल वानखेडे, सारंग झाडे, संतोष ठाकरे, रोशन तडस, सुधाकर उमाळे, राज ठाकरे, लक्ष्मीकांत काकडे, भोजराज काकडे, वाडीभस्मे, भरत तिरोडे, मंगर, पिंटु येरणे यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
मोजमाप प्रक्रिया थांबविण्याची मागणी
“शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय होईपर्यंत भूमापन प्रक्रिया थांबवावी,” अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई करू नये, अशी भूमि काही त्यांनी घेतली. आंदोलनामुळे गुरुवारी भूमापना ची प्रक्रिया होऊ शकली नाही. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी शुक्रवार (दि.४) सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे बोरी सह परिसरातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





