spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; एटीएम, ज्वेलर्स फोडीप्रकरणी चार संशयित ताब्यात

– तीन तरुणांसह विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश; न्यायालयाकडून मध्यवर्ती कारागृहात रवानगी

खापा, वार्ताहर :- शहरातील बाजार चौक परिसरात (दि. ३१ ऑगस्ट) सोमवारला मध्यरात्री एटीएम तसेच सोन्या-चांदीचे दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही घटना (दि. १ सप्टेंबर) मंगळवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेचा तपास हाती घेत खापा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन तरुणांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या प्रकरणी खापा पोलीस स्टेशनमध्ये पोस्टे अप. क्र. ५३३/२०२६ अन्वये कलम ३०५(ए), ३०३(२), ६२, ३(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग सागर खर्डे यांच्या नेतृत्वात आणि खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड, पोलीस हवालदार श्याम सोलंकी, पोलीस कॉन्स्टेबल परवेज शेख, राकेश बंधाटे आणि अक्षय शेंडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

“नऊ गुन्हे दाखल असलेला संशयित ताब्यात”

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये अमर बंडूजी सराटे (वय २२, रा. आजनी, ता. सावनेर) याचा समावेश असून, त्याच्यावर सावनेर, खापा व केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच प्रेम विनोद वानखेडे (वय १९, रा. गणेश मंदिर परिसर, सावनेर), जयचंद उर्फ कालू पिंटूजी सोनवणे (वय १९, रा. आजनी, ता. सावनेर) आणि १७ वर्षे ८ महिने वयाच्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

“सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे”

एटीएम व ज्वेलर्सचे दुकान फोडण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी वेगाने कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर तपासामुळे संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामागील नेमका उद्देश, आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांचा यापूर्वीच्या चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन संशयित आरोपींची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. विधी संघर्ष बालकाला दिलासा मिळाला असून त्याला आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपपत्र दाखल केल्यावर कोर्टासमक्ष हजर करण्यात येईल. पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.