खापा, वार्ताहर :- खापा शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुकेश सुरेशजी पावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शहर युवक काँग्रेसच्या बैठकीत पावडे यांच्या नावाला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने संमती दर्शविली. त्यानंतर वैभव अढाऊ यांनी त्यांच्या निवडीचा प्रस्ताव वरिष्ठ नेतृत्व तसेच युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सादर केला. वरिष्ठ नेतृत्वाने मान्यता दिल्यानंतर नागपूर येथील पक्ष कार्यालय, देवडिया भवन, गणेशपेठ येथे त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मुकेश पावडे हे माजी मंत्री सुनील केदार यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत. शहरातील युवकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, युवकांना संघटित करण्यासोबतच काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. युवकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे तसेच कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे सहभागी होणे, या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुकेश पावडे यांच्या निवडीसोबतच सुर्यकांत (गोलू) बारापात्रे यांच्यासह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवकांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात युवक काँग्रेसला अधिक सक्षम व सुदृढ करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील युवकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पावडे यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार राजेंद्र मुळक, आमदार संजय मेश्राम, नागपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे, विधानसभा अध्यक्ष वैभव अढाऊ यांच्यासह काँग्रेसच्या विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, नगरसेवक नामदेव गजभिये, छगन कवडे, आशिष ढाले, मिलिंद बुरडे, संजय सोनकुसळे, नगरसेविका कविता धराडे, वैशाली लाड, तसेच आशिष राठोड, अंकित मुंगोले, अक्षय हिंगे, अमोल लांबट, सक्षम तातेड, माजी युवक शहराध्यक्ष मृणाल हरडे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुकेश पावडे यांनी निवडीनंतर वरिष्ठ नेते, पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, युवक कार्यकर्ते व सर्व समर्थकांचे आभार मानले. आगामी काळात शहरातील युवकांना अधिक संघटित करून नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून, काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.





