spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएम-किसान निधी योजनेतील शेतकऱ्यांची ई-केवायसी, बँक खाते आधार लिंकसाठी विशेष मोहीम

– २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मोहीम राबविण्यात येणार

– शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नियमितपणे हप्त्यांचा लाभ मिळत राहावा, यासाठी लँड सिडींग, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात अद्याप १ लाख ८८ हजार २७० शेतकऱ्यांचे वार्षिक ई-केवायसी पूर्ण होणे बाकी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रलंबित बाबी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

शासनाच्या सूचनेनुसार योजनेच्या डेटाबेसमधील अपात्र, मृत किंवा निष्क्रिय नोंदी काढून तो पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक बनवणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे ही मोहीम राबवून सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रलंबित प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी ‘या’ तीन बाबी पूर्ण करणे अनिवार्य:

आपल्या जमिनीची नोंदणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलशी जोडावे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे बँक खात्यात जमा होण्यासाठी संबंधित बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करावी. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पोर्टलद्वार, मोबाईल ॲप किंवा सीएससी केंद्रामार्फत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रशासनाकडून मार्गदर्शन व मदत

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील महसूल व कृषी विभागाची यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन तसेच सामूहिक सुविधा केंद्रांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.

नवीन अर्ज करण्याची संधी

या विशेष मोहिमेचा कालावधी दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत असून त्यानंतरही ज्या शेतकऱ्यांच्या अनिवार्य बाबी अपूर्ण राहतील, त्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नवीन अर्ज करून आवश्यक पडताळणी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी लागेल. योजनेशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामसेवक, महसूल कर्मचारी, नजीकचे सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी दि. ३१ ऑक्टोबर पूर्वी जमिनीची नोंदणी पोर्टलला जोडणी, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी आणि ई-केवायसी या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन योजनेचा विनाखंड लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.