spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात डॉल्बीचा आवाज थांबणार! उत्सव काळात ध्वनीप्रणालीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध

– ४ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरपर्यंत डॉल्बी, डीजे आणि तत्सम ध्वनीप्रणालीच्या वापरावर बंदी

हंसराज, भंडारा :- आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये जिल्ह्यात डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस आदी मल्टीस्पीकर), प्लाझ्मा साऊंड सिस्टीम, प्रीमियम साऊंड सिस्टीम तसेच तत्सम ध्वनीप्रणालींच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजीयाबाबा छब्बीसवी, गणेशोत्सव, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव मंडळे तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रणालीचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण, नागरिकांना होणारा त्रास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्सवांच्या काळात डॉल्बी साऊंड, प्लाझ्मा साऊंड, प्रीमियम साऊंड सिस्टीम व तत्सम प्रणाली वाहनांवर वापरण्यास तसेच अशा प्रणालीसाठी वाहनांमध्ये बदल (Modify) करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

ही अधिसूचना दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 24.00 वाजल्यापासून दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत लागू राहील.

मात्र, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 मध्ये नमूद असलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टीमना या अधिसूचनेतून सूट राहील. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.