spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ड्रायव्हरची आत्महत्या: भाजप खासदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप 

 

चिक्कबल्लापूर  ८  –  येथे जिल्हा परिषदेच्या कंत्राटी चालकाने आत्महत्या केल्यानंतर भाजप खासदार के. सुधाकर यांच्यासह इतर दोन जणांविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या एम. बाबू या चालकाने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत बाबूने दावा केला आहे की, खासदार सुधाकर आणि नागेश यांनी त्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून २५ लाख रुपयांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषदेतील एका लेखा सहाय्यकानेही त्याला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बाबूने चिक्कबल्लापूर डीसी कार्यालयाच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू केला असून बाबूच्या पत्नी शिल्पा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी खासदार के. सुधाकर, नागेश आणि मंजुनाथ या तिघांविरोधात आर्थिक फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुशल चौकसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही अत्यंत गंभीर बाब असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. आरोपींनी खरोखरच बाबूची फसवणूक केली की त्यांच्या नावाचा गैरवापर झाला, हे तपासाअंती स्पष्ट होईल. दरम्यान, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार सुधाकर यांनी बाबूशी कोणताही संबंध नाकारला असून, “मला बाबूच्या मृत्यूबद्दल दुःख आहे, पण मी त्याला कधीच पाहिले नाही, भेटलोही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. सुधाकर यांनी हेही सांगितले की, “दोन व्यक्तींनी बाबूला नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे ऐकले आहे, मात्र मी त्या दोघांनाही वैयक्तिकरित्या ओळखत नाही.”

Popular Articles