– रामलीला मैदानावर लाखो कर्मचारी सहभागी होणार; देशभरात तयारीला वेग – सुभाष लांबा
नागपूर :- जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत करावी, आठवा वेतन आयोग कर्मचारीहिताच्या दृष्टीने लागू करावा, कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे, सरकारी विभागांतील रिक्त पदे भरावीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा, या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत देशभरातून लाखो कर्मचारी, पेन्शनधारक व कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमुख मागण्या
एनपीएस व यूपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी.
पीएफआरडीए कायदा रद्द करावा. कंत्राटी, मानधन, आउटसोर्सिंग व रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करावे. सरकारी विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे नियमित भरतीने भरावीत. आठवा वेतन आयोग कर्मचारीहिताच्या दृष्टीने लागू करावा.

3.8 फिटमेंट फॅक्टर आणि 5 टक्के वेतनवाढीचा दर लागू करावा. एचआरए 30, 35 व 40 टक्के दराने द्यावा.
ग्रुप ‘डी’ कर्मचाऱ्यांसाठी किमान 40 हजार रुपये वेतन निश्चित करावे.
दर दहा वर्षांऐवजी दर पाच वर्षांनी वेतन सुधारणा करावी.
18 महिन्यांचा प्रलंबित डीए/डीआर व इतर थकबाकी तातडीने द्यावी.
‘समान काम, समान वेतन’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
चारही कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द कराव्यात. सरकारी विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खासगीकरण व निगमीकरण थांबवावे.
कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी कॅशलेस उपचाराची व्यापक आरोग्य विमा योजना लागू करावी.
‘वन नेशन, वन पेन्शन’ची मागणी
ओपीएस लागू केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असा प्रचार केला जात असताना दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कर्जमाफी व करसवलती दिल्या जात असल्याचा आरोप लांबा यांनी केला. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा होते; मग ‘वन नेशन, वन पेन्शन’ का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
देशात लाखो पदे रिक्त :
देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असताना केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांसह सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास एक कोटी पदे रिक्त असल्याचा दावा लांबा यांनी केला. ही पदे तातडीने नियमित भरतीद्वारे भरण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातून मोठा सहभाग 12 डिसेंबरच्या दिल्लीतील राष्ट्रीय रॅलीत महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे गोपीचंद कातुरे यांनी व्यक्त केला. रॅलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांत कर्मचारी परिषदा, गेट मीटिंग, जनजागृती व प्रचार अभियान राबविण्यात येणार आहे. श्रीनगर बैठकीत कृती आराखडा राष्ट्रीय रॅलीच्या तयारीसाठी 12 व 13 सप्टेंबर रोजी श्रीनगर येथे महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील कर्मचारी, पेन्शनधारक व कामगारांना रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला अशोक दगडे, ज्ञानेश्वर महल्ले, मेघा करारे, मिलिंद धोंगडे, गोपीचंद कातुरे, उत्तम झेंलगुदे, उदय चांदूरकर, पुरुषोत्तम मिलमिले, वासुदेव वाकोडीकर आदी उपस्थित होते. 12 डिसेंबरची दिल्ली रॅली ऐतिहासिक व अभूतपूर्व करण्यासाठी कर्मचारी, पेन्शनधारक, कंत्राटी कर्मचारी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुभाष लांबा यांनी केले.पत्रकार परिषदेला उपस्थित सुभाष लांबा, अशोक दगडे, गुरुप्रित सिंग, बुधाजी सुरकार, ज्ञानेश्वर महल्ले, पुरुषोत्तम मिलमिले, गोपीचंद कातुरे आणि वासुदेव वाकोडीकर यांची उपस्थिती होती.





