spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीत आरोग्य सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची आढावा बैठक आज (दि. ७ सप्टेंबर) समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह येथे पार पडली. बैठकीत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

UPHC व UHWC मधील मनुष्यबळाचा आढावा

बैठकीदरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC) व शहरी आरोग्य व कल्याण केंद्रे (UHWC) येथील मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये २६४ ANM पदे मंजूर असून २५४ कार्यरत, १०२ GNM पदे मंजूर असून ९५ कार्यरत, तर १,१५७ आशा स्वयंसेविका मंजूर असून १,११२ कार्यरत असल्याची माहिती NUHMच्या शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम यांनी दिली.

उर्वरित रिक्त पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार बाह्यस्त्रोत संस्थेमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश

NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया गतीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. UPHC व UHWC केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करून नागरिकांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच, महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये मुदत संपलेली औषधे आढळल्यास संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश सभापतींनी दिले.

६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या, अग्निसुरक्षा व्यवस्था, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, रुग्णांच्या हक्कांचा (Patients’ Rights) चार्ट दर्शनी भागात लावण्यात आला आहे किंवा नाही, तसेच उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा दरफलक (Rate Chart) प्रदर्शित करण्यात आला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येत आहे.

संबंधित रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम तसेच लागू असलेल्या संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना आवश्यक त्या सूचनांसह नोटीस बजावावी, असे निर्देश सभापती मनीषा अतकरे यांनी दिले.

रुग्णालयांच्या तपासणीदरम्यान पार्किंग व्यवस्थेबाबत त्रुटी आढळल्यास, संबंधित सहाय्यक आयुक्त व नगररचना (Town Planning) विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात.

आरोग्य समितीचे सदस्य श्रीकांत आगलावे यांनी रुग्णालय तपासणीदरम्यान किती नोटिसा बजावण्यात आल्या, कोणत्या त्रुटी आढळून आल्या याची लेखी माहिती सादर करण्याची तसेच समितीच्या सदस्यांना आणि नगरसेवकांना त्याची माहिती देण्याची सूचना केली. तपासणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

फॉगिंग व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या सूचना

शहरातील प्रत्येक झोनमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर फॉगिंग मशीनची संख्या वाढवून फॉगिंग व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

हिवताप अधिकारी डॉ. मोनिका चारमोडे यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या प्रत्येक झोनमध्ये ३ फॉगिंग मशीनचा वापर करण्यात येत असून काही मशीन दुरुस्तीच्या प्रक्रियेत आहेत. तसेच ब्रीडिंग चेकरच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य समितीचे सदस्य योगेश मडावी यांनी फॉगिंगसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित केंद्रांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, फॉगिंगच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची झोननिहाय यादी समितीच्या सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली.

बोगस डॉक्टरांविरोधात कडक कारवाई

सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबरोबरच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. झोननिहाय विशेष पथकांमार्फत नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

UHWCमध्ये उपचारासाठी पैसे मागितल्यास कारवाई

महानगरपालिकेच्या UHWCमध्ये नागरिकांकडून वैद्यकीय उपचार किंवा शासकीय आरोग्य सेवांसाठी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास त्याची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश सभापती मनीषा अतकरे यांनी दिले.

नागरिकांना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमधून पारदर्शक, दर्जेदार व नागरिकाभिमुख आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता असून, आरोग्य सेवा अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे असे निर्देश सभापती मनीषा अतकरे यांनी बैठकीच्या शेवटी दिले.

या बैठकीला वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनीषा अतकरे, उपसभापती श्रीकांत आगलावे, सदस्य योगेश मडावी, सदस्या पूजा भुंगावकर, रजनी वानखेडे, भावना लोणारे, असिफ शेख मांडवा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मोनिका चारमोडे, क्षयरोग अधिकारी डॉ. जिचकर एन,यू.एच.एम.चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, , झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. वर्षा देवस्थळें, डॉ.जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. सुलभा शेंडे डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. शीतल वंदिले पी.एच.एन. अर्चना खाडे, दिपाली नागरे व झोनल अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.