नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने धडक कार्यवाही करीत सोमवार (ता. ७) रोजी विविध अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. यात धरमपेठ झोन अंतर्गत पादचारी पथावरील अनधिकृतपणे ठेले व दुकाने लावणाऱ्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे.
मनपाच्या प्रवर्तन विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रेस्टोरेंट, दुकाने व ठेले या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
धरमपेठ झोन : धरमपेठ झोन अंतर्गत रवी नगर बस स्थानक परिसरातील काही नागरिकांनी अनधिकृतपणे पादचारी पथावर अतिक्रमण व परिसरात काही अनधिकृत ठेले व दुकानेही उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई करत संबंधितांचे अनधिकृत साहित्य जप्त करून व दुकाने हटवून परिसर रिकामा केला. यामुळे रवी नगर बस स्थानक परिसरात कारवाई करण्यात आली.





