spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

– ‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक व जागतिक वारसा मूल्य लक्षात घेता किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, अन्य संरचनांबाबत तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

शिवनेरी किल्ला व परिसरातील स्थितीबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) अधिकारी, पुरातत्त्व विभाग, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक झाली.

शिवनेरी किल्ला हा जागतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, संबंधित वारसा वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

किल्ला परिसरातील संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांची तपासणी

या तपासणीसाठी केंद्र सरकारच्या ‘नेत्रम’ ॲपचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे एखादी संरचना कोणत्या कालावधीपासून अस्तित्वात आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ‘महास्टॅट’ यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध तांत्रिक माहितीचा वापर करून संरचनांची कालानुक्रमिक पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवनेरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित संरचना जागतिक वारसा स्थळाच्या बफर झोनच्या नियमांचे उल्लंघन करतात का, याबाबत अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिवनेरीच्या वारसा संवर्धनाशी संबंधित बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अनधिकृत असल्याचे निष्पन्न झालेल्या संरचनांबाबत नियमानुसार नोटीस बजावून, त्यावर सात दिवसांच्या आत पुनरावलोकन करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

शिवनेरी किल्ल्याचे पुरातत्वीय आणि जागतिक वारसा मूल्य अबाधित ठेवणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.