spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आई’ सांगीतिक कार्यक्रमातून उलगडणार मातृत्वाची महती

• कथा, कविता, किस्से आणि गाण्यांमधून आईच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि वात्सल्याचा भावस्पर्शी जागर; १० सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे विशेष सांगीतिक कार्यक्रम

मुंबई :- आईच्या प्रेमाची, वात्सल्याची, त्यागाची आणि ममतेची महती कथा, कविता, किस्से आणि भावस्पर्शी गीतांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘आई’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे करण्यात आले आहे.

आई या नात्याभोवती गुंफलेले प्रेम, माया, त्याग, संघर्ष आणि वात्सल्य यांचा भावस्पर्शी प्रवास या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. कथा, कविता, किस्से आणि गाण्यांच्या माध्यमातून आईच्या विविध भावछटांचे संवेदनशील दर्शन घडविण्यात येणार असून, मातृत्वाच्या नात्याचे भावविश्व कलात्मक पद्धतीने रसिकांसमोर साकारले जाणार आहे.

या सांगीतिक कार्यक्रमात गायक कलाकार अर्चना गोरे, प्रिती जोशी, चैत्रल पोतदार, डॉ. जय आजगांवकर, ज्ञानेश पेंढारकर आणि राज ठाकूरदेसाई आपल्या सुरेल गायनातून आईच्या प्रेमाची विविध रूपे सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन व निवेदन अनिल हर्डीकर यांचे असून सहनिवेदिका म्हणून निवेदिता सराफ सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सत्यजित प्रभू यांचे आहे.

आईच्या आठवणी, तिच्या मायेची ऊब, जीवनातील तिचे स्थान आणि तिच्या त्यागातून घडणारे व्यक्तिमत्त्व या विविध पैलूंना कथा, कविता, किस्से आणि गीतांची सुरेल साथ लाभणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सांगीतिक सादरीकरण न राहता प्रत्येकाच्या मनातील ‘आई’च्या आठवणींना उजाळा देणारा भावस्पर्शी अनुभव ठरणार आहे.

आई हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते आहे. तिच्या ममतेला, त्यागाला, प्रेमाला आणि संस्कारांना शब्द व सुरांच्या माध्यमातून अभिवादन करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. विविध पिढ्यांतील रसिकांना आपलेसे वाटणारे साहित्य आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात अनुभवता येणार असून, मातृत्वाच्या विविध भावछटांचा संवेदनशील कलाविष्कार यानिमित्ताने साकारला जाणार आहे.

हा सांगीतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. आईच्या प्रेमाची, वात्सल्याची, त्यागाची आणि संस्कारांची महती संगीत, साहित्य, कथा व कवितांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच दर्जेदार सांगीतिक व साहित्यिक कलाविष्कारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रसिकांनी वेळेत प्रवेशिका घेऊन गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता आयोजित या भावस्पर्शी सांगीतिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.