– एमएसएमई विकास कार्यक्रमाचा उत्साहात समारोप
नागपूर :- विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा. बदलत्या औद्योगिक परिस्थितीतील संधी ओळखून उद्योजकीय दृष्टिकोनातून पुढे जात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासात योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांनी केले.
एमएसएमई डीएफओ, नागपूर यांच्या वतीने सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर येथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर आयोजित पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील विकास कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला. समारोप समारंभाला उपसभापती सचिन अहीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळीमाजी मंत्री डॉ. अनीस अहमद, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पाच दिवसीय कार्यक्रमात उद्योजकता, नवोपक्रम, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती तसेच विद्यार्थी आणि युवा उद्योजकांना एमएसएमई क्षेत्रातील उपलब्ध संधींची माहिती देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, नव्या संधी ओळखणे आणि त्यातून रोजगारनिर्मितीला चालना देणे, या उद्देशाने विविध मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली.
समारोपप्रसंगी बोलताना उपसभापती सचिन अहीर यांनी एमएसएमई, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलत्या काळातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि बदलत्या औद्योगिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी मिळवणे पुरेसे नाही. शैक्षणिक पात्रतेसोबतच विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे, आत्मविश्वास वाढविणे, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि सातत्याने आपल्या क्षमतांचा विकास करावा तसेच दृढनिश्चयाने आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मंत्री डॉ. अनीस अहमद आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमएसएमई क्षेत्रातील संधी, उद्योजकतेची आवश्यकता आणि बदलत्या रोजगारविश्वाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली.





