spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज

– “मारबत महोत्सवा”च्या अनुषगाने महापौरांनी घेतला आढावा

नागपूर :- नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत असून, येत्या ११ सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज आहे. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. बडग्या-मारबत महोत्सवात सर्वांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर  निता ठाकरे यांनी सांगितले.

नागपूरची पारंपारिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यासाठी महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत मंगळवार (ता.८) बैठक पार पडली. बैठकीला स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त निर्भय जैन, मंगेश खवले, राजेश भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता विजय गुरुबक्षाणी, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे,राजीव गौतम, गिरीश लिखार, सचिन रक्षमवार, अनिल गेडाम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, विवेक रानडे, गजानन रानडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

नागपूर शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्यासह शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्धकरण्यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

बैठकीत महापौर निता ठाकरे यांनी मारबत मार्गावर भ्रमण करणाऱ्या नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. सोबतच महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात असेही निर्देश त्यांनी दिले. मारबत व बडग्या यांच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था करण्याच्या सूचना सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी दिल्या.

तसेच महोत्सवासाठी परदेशातून येणाऱ्या वाणिज्य राजदूत/परदेशी प्रतिनिधी, मंत्री महोदय,लोकप्रतिनिधी, सिनेअभिनेता आदी मान्यवरांच्या शिष्टाचाराचे उत्तम पालन करण्यात यावे, अशी सूचना स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी मारबत महोत्सवाच्या नियोजनासह महोत्सवा अंतर्गत आयोजित भजन संध्या, छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आदी विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.