spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भात महापाषाण संस्कृतीचा उदय तीन लाख वर्षांपूर्वी – डॉ. मनोहर नरांजे यांची माहिती

नागपूर :- अश्मयुगीन काळाचे पुरावे विदर्भात विपुल प्रमाणात आढळतात. साधारण तीन लाख वर्षांपूर्वी विदर्भात महापाषाण संस्कृतीचा उदय झाला, अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे यांनी दिली. संचालक माहिती व जनसंपर्क (नागपूर- अमरावती विभाग) कार्यालयातर्फे आयोजित ‘संवाद’ उपक्रमात आज ते बोलत होते.

विदर्भातील पाषाण संस्कृतीचा वेध घेतना डॉ. नरांजे म्हणाले की, जगात अश्मयुगाची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात झाली. महाराष्ट्रातील पहिले अश्मयुगीन अवजार १८६५ साली आढळले. विदर्भात वर्धा, पैनगंगा, वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यातही अश्यमुगीन अवजारे मोठ्या प्रमाणात सापडली असून, अशी जवळपास शंभर स्थळे विदर्भात आहेत व त्यातील बहुतांश चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अश्मयुगीन काळाचा विचार करताना चंद्रपूर जिल्ह्यातील ‘पापा मिया की टेकडी’ हे अतिशय महत्त्वाचे स्थळ असून, या ठिकाणी हत्यारांची निर्मिती व्हायची. अमरावती जिल्ह्यात तुळजापूर गढी, कौंडिण्यपूर, नागपूर जिल्ह्यात माहूरझरी येथेही अवजार निर्मितीचे पुरावे आढळले आहेत. अश्मयुगीन मानव नंतरच्या ककाळात गुहांमध्ये राहात होता, हे विदर्भातीलच कचरागडच्या गुहेवरून लक्षात आले. पाचशे लोक एकाचवेळी बसू शकतील, अशी ही विशाल गुहा महाराष्ट्रातील सर्वात मोठी गुहा आहे. नागपूर जिल्ह्यातही काही गुहा सापडल्या आहेत. या गुहांमध्ये माणसाने काढलेली चित्रे आढळतात. पूर्व विदर्भात महापाषाण संस्कृतीचे पुरावे मोठ्या प्रमाणात सापडतात. गुहा या निसर्ग निर्मित, तर लेणी मानव निर्मित आहेत. बहुतांश लेणी बौद्ध काळातील असून, बौद्ध भिक्कूंच्या वर्षावासासाठी त्या कोरल्या गेल्या होत्या. मांडवगोटा किंवा शिलाप्रकोष्ठ हादेखील पाषणा संस्कृतीशी संबंधित असून, देशातील सर्वात मोठा मांडवगोटा विदर्भातील हिरापूर येथे असल्याचे डॉ. नरांजे यांनी यावेळी सांगितले.

अनेक कारणांनी आपण प्रवास करीत असतो, मात्र वेगळी दृष्टी असेल तर आपण जागकडे त्या नजरेने पाहू शकतो. ती दृष्टी विकसित व्हावी, हाच ‘संवाद’ उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगून संचालक डॉ. गणेश मुळे म्हणाले की, आवर्जून बघावी अशी अनेक पुरातत्त्वीय स्थळे विदर्भात आहेत. राज्यातील पुरातत्त्वीय स्थळांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहेच, पण समाज म्हणून ती आपलीही जबाबदारी आहे. प्रारंभी डॉ. नरांजे यांचे स्वागत डॉ. मुळे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.