spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाढीव कराविरोधात कुहीत सर्वपक्षीय जनआक्रोश; नगरपंचायतीवर मोर्चा धडकला !

कुही :- कुही नगरपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या वाढीव कर आकारणीच्या विरोधात बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) कुहीत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारत माता चौक येथून निघालेला हा मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर धडकला.

घरकरात प्रस्तावित वाढीसह घनकचरा कर, शिक्षण कर, विशेष शिक्षण कर, अधिभार, स्वच्छता कर, दिवाबत्ती कर आदी विविध करांचा अतिरिक्त भार नागरिकांवर टाकण्यास मोर्चेकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारे, स्ट्रीट लाईट आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांची अवस्था समाधानकारक नसताना करवाढ कशासाठी, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रस्तावित करवाढ तात्काळ रद्द करावी आणि नागरिकांवरील कराचा भार कमी करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

या मोर्चात आमदार संजय मेश्राम, नगरसेवक सरीन शंभरकर, नगरसेवक महादेव जीभकाटे, देविदास ठवकर, सुरेश येळणे, नगरसेवक विनोद हरडे, रामकृष्ण डहाके, चंदा येळणे, सदानंद लेंडे, आकाश लेंडे, राजू येळणे, प्रतीक ढबाले, पिंटू पठाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“जनतेची लूट बंद करा, वाढीव कर रद्द करा!” अशा घोषणांनी नगरपंचायत परिसर दणाणून गेला. वाढीव कराचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

कराच्या बदल्यात सुविधा द्या; अन्यथा करवाढ रद्द करा, अशी ठाम भूमिका घेत कुहीकरांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुही पोलीस प्रशासनाकडून चोख व नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.