spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कृत्रिम रंगांच्या वापरावर आता ‘एफडीए’ची नजर

– हॉटेल, रेस्टॉरंटसह स्ट्रीट फूड स्टॉलची तपासणी; नियमभंग करणाऱ्यांचे लायसन रद्द होणार

 हंसराज भंडारा :- खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी त्यामध्ये अनधिकृत अथवा प्रमाणापेक्षा अधिक कृत्रिम रंगांचा वापर करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड वेंडर्सवर आता अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाचा नियमभंग आढळल्यास संबंधितांचे लायसन रद्द करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या सभाकक्षात अन्न व सुरक्षा विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगांची तपासणी करण्यासह अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस अन्न सुरक्षा अधिकारी यु. एम. चरडे, बी. एल. बोरकर, पूनम  तुरकर आणि पूजा बोरकर उपस्थित होते.

हातगाड्या, स्टॉलवरही तपासणी

या विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने यांच्यासह विविध खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाड्या व स्टॉलचीही तपासणी केली जाणार आहे. खाद्यपदार्थ तयार करताना वापरले जाणारे रंग, त्यांचे प्रमाण, अन्नपदार्थांचा दर्जा व गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावे

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्यांचे लायसन रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना स्वच्छता व गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. कृत्रिम रंगांचा गैरवापर किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.