खापा, वार्ताहर :- बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा लहान पोळा अर्थात तान्हा पोळा खापा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नंदीबैलांना आकर्षक सजवून चिमुकले आपल्या आई-वडिलांसह विविध ठिकाणी आयोजित तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मिळालेली बक्षिसे, शालेय साहित्य, बिस्किटे आणि मेडलमुळे चिमुकल्यांच्या आनंदाला उधाण आले.
तान्हा पोळ्यानिमित्त सकाळपासूनच चिमुकल्यांची लगबग सुरू होती. सुतारांकडून लाकडी ठोकळ्यांवर कोरीव व नक्षीकाम करून तयार केलेले नंदीबैल मुलांनी मोठ्या हौसेने खरेदी केले. त्यानंतर या नंदीबैलांना रंग, फुलांच्या माळा, आकर्षक सजावट आणि विविध साजशृंगार करून चिमुकले त्यांना घेऊन तान्हा पोळ्याच्या ठिकाणी दाखल झाले. पारंपरिक संस्कृतीची जपणूक करताना मुलांच्या कल्पकतेचीही यावेळी झलक पाहायला मिळाली.
शहरातील भवानी माता मंदिर चौक येथे आझाद क्रीडा मंडळ व प्रज्वल महेश बुरडे यांच्या वतीने तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सुमारे ५०० चिमुकल्यांना शालेय उपयोगी साहित्य, बिस्किटे व मेडल देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तसेच माता माय मंदिर परिसर, नगर परिषद कॉम्प्लेक्स, नवीन वस्ती आणि गुमगाव खान फुटबॉल ग्राउंड येथेही नंदीबैल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी बाळगोपाल आपल्या आकर्षक नंदीबैलांसह आई-वडिलांच्या सोबतीने सकाळपासूनच मोठ्या उत्साहात दाखल झाले होते. बक्षिसे व प्रोत्साहनपर भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमातून परतताना अनेक चिमुकल्यांनी मंदिरात जाऊन देवासमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. घरी नंदीबैलांचे व चिमुकल्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या दक्षिणेमुळे त्यांच्या आनंदात आणखी भर पडली.
तान्हा पोळ्यानंतर परिचितांच्या घरी मिळणाऱ्या ‘बोजारा’च्या दक्षिणेची चिमुकले आतुरतेने वाट पाहत होते. बोजारा मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता. त्यामुळे तान्हा पोळा हा चिमुकल्यांसाठी केवळ परंपरेचा सण न राहता आनंद, उत्साह आणि संस्कृतीच्या जपणुकीचा सुंदर सोहळा ठरला.
यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद बुरडे, आशिष ढाले, नगरसेविका कविता स्वप्निल धराडे व वैशाली अखिल लाड, युवक काँग्रेस अध्यक्ष मुकेश पावडे यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले. प्रज्वल महेश बुरडे व अनुराग बुरडे यांच्या वतीने बिस्किटे व मेडलचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजेशचंद्र बुरडे, प्रकाश केकतपुरे, सोनबा केकतपुरे, नारायण लांबट, शकूर शेख, विलास पालंदुरकर, रामाजी हिवरकर, गौरव बोंदरे यांच्यासह शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले.





