– ठाणेदार भिमाजी पाटील यांच्या आवाहनाला बाल गणेशोत्सव मंडळाची साथ
हंसराज,भंडारा जवाहरनगर :- उत्सवातील वाढते ध्वनीप्रदूषण आणि विकृत स्वरूप टाळून पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनाला सकारात्मक साथ देत ठाणा येथील ‘बाल गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद कॉलनी’ने यंदा ‘डीजे’ला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक पद्धतीने ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील यांनी परिसरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. या वेळी त्यांनी ध्वनीप्रदूषण टाळून शांततापूर्ण, भक्तिमय आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपणारा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या या विधायक उपक्रमाला प्रतिसाद देत स्वामी विवेकानंद कॉलनीतील बाल गणेशोत्सव मंडळाने कर्णकर्कश डीजे न लावता केवळ टाळ, मृदंग आणि भजनाच्या निनादात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे.
गणेशोत्सव हा केवळ आनंदोत्सव नसून तो सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि संस्कृती संवर्धनाचे माध्यम आहे, हा विचार या मंडळाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. या पर्यावरणपूरक व शांतताप्रिय निर्णयाचे जवाहरनगर पोलीस प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. परिसरातील इतर गणेश मंडळांनीही या मंडळाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शांततापूर्ण आणि डीजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ठाणेदार भिमाजी पाटील यांनी केले आहे. मंडळाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे.





