– ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक; ‘ओटीपी’ चालणार नाही: जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे
हंसराज,भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत भंडारा जिल्ह्यातील २,५९१ पात्र शेतकरी कर्जदारांचा समावेश करण्यात आला असून, यापूर्वी २२,३३६ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
शासनाच्या ०२ जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार ही कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ३०,५९४ कर्जखात्यांची माहिती ‘महाआयटी’मार्फत विकसित केलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. या माहितीचे संगणकीय संस्करण करून पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २२ हजार ३३६ आणि आता दुसऱ्या टप्प्यात २ हजार ५९१ अशा एकूण २४ हजार ९२७ शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहे.
ग्रामपंचायत व बँकांमध्ये याद्या उपलब्ध; मोबाईलवर येणार एसएमएस
पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायटी) कार्यालय तसेच संबंधित बँकांच्या शाखांमध्ये फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. याशिवाय संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आधार प्रमाणीकरणाबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठवले जात आहेत.
ॲग्रीस्टॅक नोंदणी व बायोमेट्रिक पद्धतीनेच आधार प्रमाणीकरण यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक (युनिक आयडी) देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रिक (अंगठ्याचे ठसे देऊन) पद्धतीनेच आधार प्रमाणीकरण (KYC) करून घेणे अनिवार्य आहे. या योजनेत ‘ओटीपी’ (OTP) द्वारे आधार प्रमाणीकरण होणार नसून केवळ बायोमेट्रिक पद्धतच ग्राह्य धरली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ (Agristack) पोर्टलवरील नोंदणी आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमाफीच्या लाभाची रक्कम ‘डीबीटी’द्वारे (थेट लाभ हस्तांतरण) थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.
“जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विनाविलंब जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, जेणेकरून कर्जमुक्तीचा लाभ वेळेत थेट बँक खात्यात जमा होईल.”
— विलास देशपांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा





