कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे काल गावकऱ्यांनी झडत्यांच्या फैऱ्या झाडत आणि वाजंत्राच्या तालावर बाजार चौकात सजलेले बैल आणत मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला. ग्राम पंचायतीच्या वतीने बाजार चौकात बांधलेले आम्र तोरण तोडल्यावर बैलपोळा फुटला गेला.
तसेच सकाळी जि.प.उ.प्रा शाळा आजनी येथे शिक्षकांच्या वतीने आयोजित तान्हा पोळ्या निमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत कृषी क्षेत्रावर आधारित गाण्यावर ठेका धरला. या कार्यक्रमाला ललिता ठाकरे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे इतर पालक मंडळी, सरपंच हेमराज दवंडे, गावातील प्रतिष्ठित मंडळी व शाळेतील मुख्याध्यापिका ललिता आंडे, शिक्षक जितेंद्र सिंग बुंदेले, धकाते, जैन , मेश्राम उपस्थित होत्या.
शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारतीय पारंपरिक शेतकरी वेशभूषा करून आपल्या नंदी बैलासोबत शाळेत उपस्थिती लावली. तान्हापोळ्याच्या या कार्यक्रमात बक्षिस तसेच प्रसाद वितरण करण्यात आला.
रीयांश मानकर,रीयांशी मानकर, सुशांत रहांगडाले, पूर्वा उकेबोंदरे, सुहानी रहांगडाले, जित शरणागत, हर्षल जेवडे, सार्थक दवंडे, नंदिनी जगनाडे, आरुषी धदंरे, जय ठाकरे यासह इतर विद्यार्थी विविध वेशभूषेत आले होते.





