– खलाशी लाईन येथे तान्हा पोळा उत्साहात; विविध वेशभूषेतील बालकांचा सहभाग, शेतकऱ्यांचा सत्कार
कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण असलेल्या पोळ्याची परंपरा बैलपोळा आणि तान्हा पोळ्याच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रात जपली जात आहे. तान्हा पोळा हा केवळ बालकांच्या विरंगुळ्याचा उत्सव नसून, त्यातून लहान मुलांना कृषी संस्कृती, शेतकरी जीवन आणि बैलांचे महत्त्व यांची शिकवण मिळते, असे प्रतिपादन तान्हा पोळा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुभाष सोमकुवर यांनी केले.
खलाशी लाईन येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहभागी बालकांनी लाकडी व मातीच्या नंदीबैलांना सजवून घरोघरी नेले. नागरिकांनी बालकांचे औक्षण करून त्यांना दक्षिणा, गोड मिठाई व चॉकलेट देत उत्साहाने स्वागत केले.
कार्यक्रमात बालकांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला. सहभागी बालकांना गोड मिठाई, फळे, चॉकलेट व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी घोरपड गावातील तरुण प्रगतिशील शेतकरी मंगेश लांजेवार तसेच शेतकरी पुरुषोत्तम नागपुरे यांचा आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद मेश्राम, रमेश डोंगरे, सुनील रामटेके, विकेश लांजेवार, राजेश मेश्राम, सीमा सोमकुवर, साक्षी रंगारी, शरद खोब्रागडे, ललिता मेश्राम, नंदा डोंगरे, भारत मोटघरे, आशाताई चवरे, निकेश लांजेवार, छोटी लांजेवार, प्रांजल मोटघरे, आदित्य बेलेकर, करण मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बालकांना गोड मिठाई देऊन तान्हा पोळ्याचा आनंद साजरा करण्यात आला.





