spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा राष्ट्रीय महामार्गावर आयशर-बोलेरोची भीषण धडक; ९ जणांचा मृत्यू, १४ जखमी

हंसराज,भंडारा लाखनी :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मौजा मुंडीपार सडक (ता. लाखनी) येथे पहाटेच्या  सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात महिंद्रा बोलेरो वाहनातील ९ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने निष्पाप चिमुकल्यांसह महिलांचा समावेश असून या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ३.३१ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील साकोलीकडून लाखनीकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. द्वारका पेट्रोल पंपावरून टाटा आयशर वाहन (क्रमांक UP 72 BT 7974) चा चालक अमरसिंग रामदुलारे यादव (वय ३७, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याने कोणतीही खबरदारी न घेता आपले वाहन अचानक महामार्गावर आणले. याच वेळी साकोलीकडून आपल्या नियोजित लेनने वेगाने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहनाची (क्रमांक MH 49 U 9810) आयशर वाहनाला मागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा चक्काचूर झाला.

या भीषण दुर्घटनेत बोलेरोमधील जामबाई रामअवतार वर्मा (वय ५०, रा. नागपूर), मिनाक्षी राजकुमार वर्मा (वय २६, छत्तीसगड), गायत्री रूपेश उईर्के (वय ३०), स्विटी रूपेश उईर्के (वय ६), धैर्य रूपेश उईर्के (वय ४), सरिता विजय वर्मा (वय ३०), ग्रेशा राजकुमार वर्मा (वय २), गणेशीया अशवंत पटेल (वय २२) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (वय ३५, सर्व रा. छत्तीसगड) यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच वाहनातील सुभाष वर्मा (५), गुलशन वर्मा (१८), ललीता पटेल (२६), तन्मय पटेल (४), रामप्यारी पटेल (४५), सुखयारी पटेल (२०), रमय्या पटेल (३०), कुमारीबाई कावरे (२०), मयंक पटेल (६), रितेश वर्मा (३), मेघा वर्मा (३), लोकेश पटेल (९), डॉली पटेल (७) आणि जगदेव उर्फ जग्गु वर्मा (२६) हे १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांनी घटनास्थळी भेट दिली असून, लाखनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.